वाईचे महागणपती मंदिर

महाराष्ट्राला जसा सह्याद्रीचा नैसर्गिक ठेवा आणि छत्रपतींचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे तसाच कला, संस्कृतीचा सुद्धा वारसा लाभला आहे. इथली अनेक प्राचीन आणि मध्ययुगीन गावे कलेच्या आणि संस्कृतीच्या आविष्काराने नटली आहेत. पुणे, पैठण, नाशिक, कोल्हापूर अशी अनेक गावांची उदाहरणे देता येतील. कधीकाळी ही गावे निसर्गरम्य, अतिशय सुंदर आणि सांस्कृतिकदृष्ट्या कलासंपन्न होती यावर विश्वास बसत नाही. असेच एक नितांतसुंदर आणि कला-संस्कृतीचा संगम झालेले एक छोटेखानी गाव कृष्णा काठावर वसले आहे. वाई. चहूबाजूंनी डोंगरांनी वेढलेल्या या गावातून संथ वाहणारी कृष्णा नदी, तिच्या काठावर बांधलेले सुंदर दगडी घाट, गावातील कलात्मक मंदिरे, पेशवेकालीन आणि शिवकालीन वास्तू या सर्वांमुळे वाई शहरास एक वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे.

परंतु वाईचा हा तीनशे-साडे तीनशे वर्षांचा कलात्मक वारसा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. शहरातील अनेक जुने वाडे जाऊन त्याजागी इमारती उभ्या राहत आहेत. तर मंदिरांकडे दुर्लक्ष होऊन पडझड झाली आहे. फक्त बोटावर मोजण्या इतक्याच काही वस्तू आणि मंदिरे आजही आपले अस्तित्व टिकवून उभ्या आहेत. त्यातीलच हे एक सुप्रसिद्ध महागणपती मंदिर आणि गणपती घाट. इ. स. १७६५ मध्ये गणपतराव भिकाजी रास्ते यांनी बांधलेले हे भव्य मंदिर त्यातील गणपतीच्या विशाल मूर्तीमुळे ‘ढोल्या गणपती’ नावाने प्रसिद्ध आहे. दोन्ही मांड्या पसरून पाय रोवून उकिडवे बसलेली ही गजाननाची मूर्ती एकाच काळ्या दगडात कोरलेली आहे. सध्या दिलेल्या रंगामागे मूर्तीचे मूळ स्वरूप झाकले गेले आहे.

माझे आजोळ वाई असल्याने येथील असंख्य आठवणी मनात दाटल्या आहेत. असेच कधीतरी या गणपती घाटावर मंदिराशेजारी बसून आठवणींना उजाळा देताना काढलेले हे छायाचित्र.

Wai
वाईचे महागणपती मंदिर