एका “पॅसेंजर” चा प्रवास…

झुक झुक झुक झुक अगीन-गाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी,
पळती झाडे पाहूया… मामाच्या गावाला जाऊया…

लहानपणी आपण सर्वांनीच ही कविता ऐकली आहे, गायली आहे अणि अनुभवलीसुद्धा आहे. रेल्वेची क्रेझ कोणाला नसते? लहानपणात भोंगा वाजवत येणारी, धुरांचे ढग हवेत सोडणारी रेल्वे बघण्याचे वेड असते तर मोठेपणीसुद्धा रेल्वेमध्ये बसायला एक वेगळीच मजा येते. नुकताच माझा रेल्वे प्रवासाचा योग घडला. कऱ्हाड ते सांगली असा छोटासाच प्रवास होता.

train

पुणे-मिरज रेल्वे मार्गावरील कऱ्हाड हे एक स्टेशन. माझे मूळ गाव. येथून सांगली २ तास. बऱ्याच ट्रेन थांबतात इथे पण पहाटे येण्याऱ्या सातारा-कोल्हापूर पॅसेंजरचा प्रवास म्हणजे एक वेगळाच अनुभव. सर्व प्रकारची लोकं बघायला मिळतील तुम्हाला या गाडीत. रविवारी पहाटेच मी आणि माझी बायको कऱ्हाड स्टेशनला आलो. साडे सहाची गाडी. तिकीट काढून झाले होते, अजून १०-१५  मिनिटे वेळ होता.  म्हणून एक चहा घ्यावासा वाटला. रेल्वे-स्टेशन वर मिळणारा चहा म्हणजे एक अलगच मिश्रण असते. उकळलेल्या साखरेच्या अतिगोड पाण्यात नावापुरती चहापत्ती. पण तरीसुद्धा हे आवडीने पिणारी लोकं. तर असा खडाचम्मच  चहा पिऊन पहाटेची झोप घालवायचा माझा प्रयत्न “सक्सेसफुल” झाला. कधी नव्हे ते माझे निरीक्षणवादी मन जागे झाले अन नजर इकडे-तिकडे फिरू लागली. तसे कऱ्हाडचे स्टेशन शांतच असते. कसली गडबड नाही गोंधळ नाही. लोकांची भाऊगर्दी नाही. काही ठराविक ट्रेन इथे थांबत असल्याने तेवढ्यापुरता थोडा गजबजाट होतो. अशाच एका गजबजाटाच्यावेळी आम्ही इथे होतो. कऱ्हाड आणि आसपासच्या लोकांना किर्लोस्करवाडी, सांगली अशा ठिकाणी कामावर जायला सोयीची अशी ही पहाटे येणारी सातारा-कोल्हापूर पॅसेंजर. पण आज रविवार. त्यामुळे म्हणावी तेवढी गर्दी नव्हती. रात्री उशिरा स्टेशनवर उतरलेली माणसे अजून बाकड्यांवर झोपेतच होती. स्वच्छता कामगार प्रामाणिकपणे कचरा गोळा करत फिरत होते. एक-दोन पेपरवाले त्यांचे दुकान मांडायच्या तयारीत होते. स्टेशनमास्तर त्यांच्या खोलीमध्ये देवासमोर उदबत्ती फिरवत होते. बहुधा नुकतीच त्यांची झोपमोड झाली असावी. तेवढ्यात एका कर्मचाऱ्याने घंटा वाजवून रेल्वे येत असल्याची वर्दी दिली (अजूनही कऱ्हाड स्टेशन मध्ये रेल्वे येताना घंटा वाजवली जाते). मग एकदा आधुनिकरित्या अनौंसमेंट झाली तशी सगळ्यांची फलाटावर गर्दी जमायला लागली.  जोरदार भोंगा वाजवत गाडी स्टेशन मध्ये शिरून स्थिरावली. लोकांनी भराभर चढून जागा पटकावल्या. मी आणि बायको समोरासमोर खिडकीशेजारी बसून घेतले. वाह… लहान मुलासारखे माझे मन रेल्वेत बसल्यावर फुलून गेले होते.  परत एकदा भोंगा वाजवून गाडीने वेग घ्यायला सुरवात केली.

गाडीत फारशी गर्दी नव्हतीच त्यामुळे लोक निवांत पाय पसरून बसले होते. आमच्या डब्यात चार मुलांचा एक ग्रुप बसला होता. कॉलेजमधील मुले असावीत ती. कऱ्हाडनंतर शेणोली स्टेशन येते. जवळ-जवळ १५ मिनिटे गाडी पळत होती. बाहेर नुकतेच तांबडे फुटायला लागले होते. सगळीकडे नुसती उसाची शेती दिसत होती. शेणोली स्टेशन मध्ये गाडी थांबताच एकदम कलकलाट करत बायका-पोरांचा एक जथ्था गाडीत चढला. बहुतेक प्रत्येक डब्यात हेच चित्र दिसले. स्टेशनवर सुद्धा अजून बरेच लोक चढण्यासाठी दारापाशी  थांबले होते. एवढे सारे लोक कुठे चाललेत? आमच्या दोघांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह. बहुतेक पुढच्या गावात मोठ्या पार्टीचे लग्न असावे. नंतर प्रत्येक स्टेशनवर एवढाच लोंढावर चढत होता. शेवटी मी न राहवून एक माणसास विचारले.

“काय हो मामा, एवढी लोकं कुठे चालली?”
“मायाक्काची जत्रा हाय. चिंचलीला.”
“मग कुठपर्यंत जाणार?”
“मिरजेला बदलायची गाडी. कर्नाटकात जायाचे हाय.”

चला. म्हणजे सांगलीपर्यंत करमणूक आहे तर.  रेल्वेमधला प्रवास म्हणजे नाना प्रकारची व्यक्ती आणि वल्ली भेटतात. त्यातून जत्रेला जाणारी लोकं म्हणजे विचारू नका. जसजशी गाडी वेग धरत होती तसे बायकांचे आवाज वाढत चालले होते. मग कोणाच्या तरी लग्नातल्या गोष्टी, कोणाच्या नवऱ्याबद्दल, नाहीतर अंथरुणावर खिळलेल्या म्हातारीबद्दल. या बायका कशावरही चर्चा करू शकतात चुलीपासून मुलीपर्यंत. एका स्टेशनवर आमच्या डब्यात काही पुरुष मंडळी चढली. बसायला जागा नव्हतीच. बर्थवर लोकांऐवजी कोणाचे सामान, बारदाणे आणि कोपऱ्यात लहान पोरे झोपवलेली. तेवढ्यात एका गड्याचे बाईशी भांडण झाले. जागेवरून.

“अरं ए भाड्या… तिकडे बस की बाप्या मंडळीत. बायकांच्यात कशाला येतोय मोरावानी.. ” झाले.. हा बाप्या गडी चिडला. अहंकार दुखावला ना त्यांचा.
“तुझ्या नवऱ्याने काय ईकात घेतलीय काय जागा? तिकडं बुड टेकवाय सुदिक जागा नाय म्हणून इथं बसलोय. बायकांच्यात बसायची हौस नाय मला.” वगैरे वगैरे..

त्यांच्यात काहीतरी समझोता झाला असावा. कारण पुढे काही ही भांडी एकमेकांवर आपटली नाहीत. लोकांच्या बोलण्याला रंग चढत होता. पुरुष मंडळी कुठल्यातरी साखर कारखान्याला शिव्या घालत होती. मधुनच एखाद्या पुढाऱ्याचा उद्धार होत होता. महाद्या, आप्पा, भाऊ, शंकऱ्या इत्यादी लोकं कशी वागतात याचीसुद्धा चर्चा झाली. म्हणजे फक्त बायकाच “गॉसिपिंग” करत नाहीत तर!! दारात उभे असलेले तरणेबांड गडी आपले दिशांचे आणि भूगोलाचे ज्ञान पाजळत होते. साताऱ्याहून कोल्हापूरला जाणाऱ्या रेल्वेला ते उत्तरेकडे वळवून मोकळे झाले होते. पुढे येणाऱ्या स्टेशनची यादी तयार करत होते. पुढे किर्लोस्करवाडीमध्ये एक आंधळा भिकारी डब्यात चढला. “मिळणार नाही बाबा तुला… आई-बापाची माया” असे कुठलेतरी गाणे तारसप्तकात म्हणत तो भीक मागत होता. ५-१० रुपये जमल्यावर त्याला कोणीतरी पुढच्या स्टेशनवर उतरवून दिले.

“कंचं ठेसन आलं रे पोरा?” अचानक कानापाशी आलेल्या किरट्या आवाजाने मी थोडा गडबडलोच. एक म्हातारी अजून नांद्रे आले नाही खात्री करून घेत होती. बाजूच्या कंपार्टमेंट मधून ओळखीचा “रिक्षावाला” गाण्याचा ताल ऐकू येत होता. देवीच्या जत्रेला जाणाऱ्या बायका रिक्षावाला सारखी गाणी म्हणतात? नीट लक्ष दिले तर देवीचे गीत व्यवस्थित मीटर मध्ये बसवून म्हणत होत्या त्या. आम्ही दोघे हसून फुटायचे बाकी होतो.

नंतर त्याच-त्याच गप्पा आणि बाता ऐकण्यापेक्षा खिडकीतून बाहेर बघावेसे वाटायला लागले. बाहेरची पळणारी झाडे, भराभरा मागे जाणारी गावे बघून मजा वाटत होती. नुकतेच उजाडत असल्याने बऱ्याच गावांमधले लोकं रुळांजवळ “डबे टाकायला” बसले होते. बहुधा रेल्वेचे डबे मोजतानाच त्यांना “डबा टाकायची” सवय असावी. लहान-सहान पोरे गाडीतल्या लोकांना टा-टा करत होती. एका स्टेशनवर गाडी थांबल्यावर वडापच्या रिक्षांची गडबड दिसली. केवळ प्लॅटफॉर्मवर रिक्षा आणता येत नाही म्हणून नाहीतर त्या रिक्षावाल्यांनी तेसुद्धा केले असते. भिलवडी नंतर उसाची शेती कमी होऊन द्राक्षांच्या बागा दिसायला लागल्या. दूरवर फक्त उस आणि द्राक्षे. एखाद्या ठिकाणी पक्ष्यांचा थवा दिसला कि तिथे खाली जोंधळा असणार हे नक्की. मधूनच एखाद्या शेतात खूप सारे मोर दिसत होते. कमाल!!! हिरवाईने नटला आहे हा सारा परिसर. बाहेरची “सिनरी” आणि गाडीच्या डब्यातील “सीन” बघता बघता सांगली कधी आले कळलेच नाही. गर्दीतून काका-मावशी करत आम्ही दारापाशी येऊन उभे राहिलो. विश्रामबाग येताच उतरायचे होते.

स्टेशनवर उतरल्यावर गाडी जाईपर्यंत थांबलो. धुराचे लोट सोडत, हळूहळू वेग धरत गाडी निघून गेली. भोंगा वाजवत जाताना जणू ती सांगत होती “भेटूच परत!!!”. कधी परत येईल हा योग? परत कधी मिळेल असाच आगळा अनुभव?

फोटो – राज ढगे वाई साभार