ठाणाळे लेणी: एक नाठाळ भटकंती

चार-पाच महिन्यापूर्वी सुधागडचा ट्रेक झाला तेव्हा वेळेअभावी ठाणाळे लेणी बघायची राहून गेली होती. त्यामुळे परत कधीतरी घाटावरून उतरून हे लेणी बघायची असे ठरले होते. तो योग आत्ता जुळून आला. नेहमीचे भिडू तयार होतेच शिवाय सागर आणि स्वानंद-नभासुद्धा तयार झाले. त्यामुळे ठाणाळ्याची भटकंती फारच छान होणार होती. तेल-बेलच्या पठारावर मुक्कामी जायचे आणि तांबडं फुटायच्या आधीच घाट उतरायचा यावर एकमत झाले.

तेल-बेलची भिंत
तेल-बेलची भिंत

नुकताच चैत्र पाडवा झाला असला तरी सुर्याला ग्रीष्माचे डोहाळे लागले होते. सूर्य डोक्यावर येईपर्यंत अंगाची लाही होत होती. त्यामुळे दुपारची एक डुलकी काढून निघणे सोयीस्कर होते. जाताना पौडमार्गे जायचे असल्याने माझ्या घरी सर्वांचा डेरा पडला. स्वानंद तर दोन कोंबड्यांना स्वर्गात पोचवायची पूर्ण तयारी करूनच आला होता. ठाणाळे भागात पाण्याची कमतरता असल्याने शक्य तेवढा पाण्याचा साठा बरोबर घेतला होता. सामानाची जुळवा-जुळव करून ३ला पुणे सोडले. चांदणी चौकात नीरा दिसताच सगळ्यांच्या गाड्यांना आपसूकच ब्रेक लागले. घसा थंड करून मुळशीच्या दिशेने गाड्या सोडल्या. ताम्हिणी घाटात लोणावळासाठी एक फाटा जातो. पिम्प्री, बाप्रे, भाम्बुर्डे, सालतर अशी गावे करत हा रस्ता सहारा सिटीच्या जवळ शहापुरास जातो. याच रस्त्यावर भाम्बुर्ड्याच्या पुढे तेल-बेलचा फाटा लागतो.
भाम्बुर्ड्याहून थोडे पुढे येताच आम्ही एका ठिकाणी अक्षरशः एकमेकांवर आदळत थांबलो. एक भला मोठा नागोबा निवांतपणे रस्ता ओलांडत होते. पण आमची चाहूल लागताच त्यांची सुस्ती पळाली आणि तसेच अबाउट टर्न घेऊन कडेच्या बिळात शिरले. मग हळूच बिळातून डोकावून आमची जाण्याची वाट पाहत अस्वस्थ होत होते. त्याच्या नादाला जास्त न लागता आम्ही तेल-बेल गाठले. पेट्रोलच्या किंमतीप्रमाणे वाढत जाणारे खड्डे या रस्त्यात होते. अनेकदा तर गाडी चालवण्यापेक्षा ढकलणे सोयीचे वाटले होते. गावातील एका घरी चहा नामक बिन-दुधाचे काळे पाणी मिळाले. बुडाला आलेल्या मुंग्या घालवण्यासाठी थोडी विश्रांती घेतली आणि पश्चिमेच्या दिशेने निघालो. तेल-बेलच्या अक्राळ-विक्राळ भिंतीला उजव्या अंगाने वळसा घालून पाठीमागे कड्यावर गेलो. दिवसभर आग ओकून दमलेल्या सूर्याची अरबी सागरात बुडी मारून घसा ओला करण्याची चाललेली घाई आम्हाला दिसत होती. दुरवर सरसगड क्षितिजावर डोके काढून उभा होता तर डाव्या अंगाला सुधागड तटस्थपणे अंधाराची वाट पाहत होता. खाली कोकणातील नाडसुर, कोंडगाव आदि गावे दिवे लावणीच्या तयारीत होती. सूर्यास्त होताच सर्वांना पोटात उगवणाऱ्या भुकेची आठवण झाली आणि लगोलग चुलीची तयारी सुरु झाली. जंगली महाराज उर्फ बेअर ग्रील्सच्या नवीन घेतलेल्या नाईफचे उद्घाटन करीत लाकडे गोळा झाली. दोन चुली मांडल्या गेल्या. एक चूल हपापलेल्या राक्षसासारखी आ वासून कोंबड्यांची वाट बघत होती. पंकज आणि स्वानंदने सरावलेल्या खाटकाप्रमाणे मॅरिनेट करून आणलेल्या कोंबड्यांचे तुकडे केले आणि त्या चुलीवर भाजायला टाकले. तर दुसऱ्या गरीब बिचाऱ्या चुलीवर सूप आणि मॅग्गी शिजत होते. चिकनच्या वासावर गप्पा रंगत-तरंगत होत्या. खाणे झाल्यावर आपापल्या स्लीपिंग बॅग्स पसरून सगळे आडवे झाले. भूत-पिशाच्च वगैरे मसालेदार गोष्टी सांगून नभाला घाबरावायचा अजयचा प्रयत्न सफल झाला होता. त्यामुळे तिने आमच्या उर्वरित गप्पांमध्ये लक्ष न देता झोपणे पसंत केले. अष्टमीचा चंद्र डोक्यावर आला होता. हवेत गारवा जाणवायला लागला होता. गप्पांचा ओघ जरी कमी झाला असला तरी डोळ्यावर झोप काही केल्या येत नव्हती. त्यातूनच सागर आपण डबल बेडवर झोपलोय असे समजून बिनधास्त घड्याळाच्या काट्याप्रमाणे लोळत होता. तोपर्यंत पहाटेचे चार वाजले आणि अजयची उठायची आणि बाकीच्यांना उठवायची तयारी सुरु झाली. चंद्र मावळला होताच त्यामुळे ताऱ्यांचे फोटो काढायला सुरवात केली. तेल-बेलच्या डोक्यावर एक दुधाळ पट्टा दिसत होता. एकदम लक्षात आले की ती आकाशगंगा आहे. तिला कॅमेरात बंदिस्त करता-करता नभाची चहा तयार असल्याची हक आली. वाह. मग खडा-चम्मच चहा आणि पार्ले-जी ची थप्पी आणि सह्याद्रीचा पहाटवारा.
आकाशगंगा - Milky Way Galaxy
आकाशगंगा – Milky Way Galaxy

उजाडायच्या आधी ठाणाळ्याची वाट पकडायची असल्याने भरभर सगळे आवरून निघालो. रेडिओ टॉवरच्या शेजारून वाघजाईच्या घाटात उतरलो. पाचच मिनिटात वाघजाईचे मंदिर लागले. नमस्कार-चमत्कार करून घाट उतरायला सुरुवात केली. अजय मॅपवरून तर पंकज आनंद पाळंदेच्या पुस्तकावरून लेण्यांच्या ठिकाणाचा अंदाज घेत होते. दोन-तीन डोंगरधारा उतरून आलो तरी लेण्यांचा ठाव लागेना. नुकताच त्या भागात वणवा लागून गेल्यामुळे सगळे रान जळून गेले होते. पायवाटेच्या दोन्ही बाजूला होते फक्त जळालेले गवत आणि पाने. तेल-बेलच्या उदरात दडलेली लेणी काही केल्या आमच्या समोर येईनात. शेवटी अजय आणि पंकजने पुढे जाऊन वाट शोधायची आणि बाकीच्यांनी मागे थांबायचे असे ठरले. त्यांच्याकडे एक वॉकी-टॉकी होता आणि आमच्याकडे एक. त्यामुळे एकमेकांचा अंदाज घेणे सोयीचे होत होते. दोघांनी बरेच पुढे जाऊन लेण्यांचा अंदाज घेतला पण काही मिळाले नाही. अखेरीस आता लेण्यांची वाट शोधण्यापेक्षा माघारी फिरावे असे विचार मनात घोळायला लागले अन अजयला एका नाकाडाच्या पलीकडे कातळात खोदकाम दिसले. लगेचच वॉकी-टॉकीवरून निरोप आला “लेणी सापडली”. झाले एकदाचे घोडे गंगेत न्हायले. ३ तासाच्या शोधानंतर ठाणाळ्याची लेणी सापडली. लेण्यांपर्यंत जायची वाट सुद्धा बऱ्यापैकी अवघड होती. सागरने तर एका ठिकाणी सपशेल माघार घेतली. काही केल्या पुढे यायला तयारच होत नव्हता. हो-नाही करत हाताला धरून त्याला धीर दिला आणि पुढे आणले. एवढ्या पायपिटीनंतरचे लेण्यांचे दर्शन नक्कीच सुखावह होते.
ठाणाळे लेणी
ठाणाळे लेणी

ही बौध्द लेणी इ.स.वी. सनपूर्व दुसऱ्या शतकात निर्मिल्याचा अंदाज आहे. येथे एकूण एकवीस निवासी गुंफा आणि एक चैत्य विहार आहे. ही लेणी बघण्यास अतिशय सुंदर आहेत. चैत्य विहाराच्या छतावर अप्रतिम नक्षीकाम केलेले कमाल कोरले आहे. फोटो काढता काढता वेळ कसा गेला कळलेच नाही. आमच्या जवळचे पाणी सुद्धा संपत आले होते आणि जवळपास कुठेही पाणी नसल्याने परत फिरणे भाग होतेच. एक-दोन बिस्किटे खाऊन घेतली आणि परतीच्या वाटेला लागलो. सर्वांच्या मनात एकच प्रश्न होता. पाणी. आमच्या जवळ होते फक्त एक लिटर पाणी, थोडीफार बिस्किटे आणि अर्धापाव साखर. या जोरावर आम्हाला ३ तासाची चढाई करायची होती ती सुद्धा रणरणत्या उन्हात. सगळा डोंगर वणव्याने खाल्ल्यामुळे कुठेही नावापुरती सुद्धा सावली नव्हती. तासाभराच्या चढाईनंतर नभाला त्रास सुरु झाला. त्यामुळे तिचा आणि पर्यायाने स्वानंदचा वेग मंदावला. पाणी नसल्याने सर्वांचे घसे कोरडे झाले होते. तापत चाललेल्या उन्हाने अंगातून घाम काढायला सुरवात केली होती. त्यामुळे अजूनच थकवा जाणवत होता. नभाला थोडे पाणी आणि थोडी साखर देताना सर्वांनाच पुढच्या होणाऱ्या त्रासाची कल्पना यायला लागली होती. अजून २ तासाची वाट बाकी होती. थोड्याच वेळात पाणी पूर्णपणे संपले. आता फक्त साखर आणि थोडी बिस्किटे. पण साखरेमुळे अजूनच पाणी-पाणी होणार होते. आणीबाणीच्या काळात उपयोगास येईल म्हणून आम्ही अर्धा लिटर पंकजकडे अगदी गुप्तरित्या ठेवले होते. ते पाणी नभासाठी ठेऊन बाकीच्यांनी जमेल तसे वाघजाई पर्यंत पोचायचे असे ठरले. दर पन्नास पावलावर १० मिनिटाची विश्रांती घेत आम्ही येत होतो. पण आता सर्वांनाच त्रास व्हायला लागला होता. घाम येणे बंद झाले. हे उष्माघाताचे पहिले लक्षण. प्रत्येक वळणावर पुढच्यास विचारात होतो वाघजाईचे मंदिर आले का? कारण तिथे पाणी मिळेल अशी पुसटशी आशा होती. एका ठिकाणी पंकजचे त्राण संपले. अजयसुद्धा पूर्ण थकून गेला होता. मनाचा हिय्या करून मी न सागर पुढे जाऊन पाणी शोधायचे ठरवले. बाकीच्यांनी शक्य तेवढे वर यायचे अथवा तिथेच थांबायचे ठरले. आणीबाणीच्या पाण्याची वाटणी झाली. थोडे पाणी आमच्या बरोबर आणि बाकीचे परत सॅकमध्ये. १० मिनिटात मंदिर लागले. मी मंदिराभोवती पाणी शोधायला लागलो तर सागर पुढे पठारावरच्या टॉवरकडे निघाला. पाणी सोडाच पण आटलेले टाके सुद्धा मला सापडले नाही. पाण्याने आमच्या सर्वांच्याच तोंडचे पाणी पळवले होते. नभाला तर दिवसाढवळ्या पाण्याची स्वप्ने पडायला लागली होती. अजयने पाणी सापडले तर देवीला चांदीचा मुखवटा चढवेन असे साकडे घातले.
ठाणाळे लेणी
ठाणाळे लेणी

तेवढ्यात पठारावर पोचलेल्या सागरचा आवाज आला “अम्या पाणी आहे.” तेवढ्या आवाजाने माझ्या मनात आभाळ दाटून आले. मी लागलीच ही बातमी खाली पोचवली. उन्हाळ्यात पळस फुलतात तसे सर्वाचे डोळे फुलले. आहे पाणी आहे. टॉवरवाल्या बाबांनी जवळचेच पाण्याचे टाके दाखवले. कसलेही कुठलेही पाणी प्यायची सर्वांची तयारी झाली होतीच. त्यामुळे या टाक्यातील पाण्याची जास्त चिकित्सा न करता बाटली बुडवली तस एक बेडूक टुण्णकन उडी मारून बाटलीवर आला. फटाफट बाटल्या भरून घेतल्या आणि वाघजाईच्या मंदिरात पोचलो. प्रत्येकाने एकेक बाटली पाणी पिऊन मंदिरातच लोळण घातली. देवीचे मनोमन आभार मनात अर्ध्यातासाची झोप झाली. परत एकदा ताक्ताचे पाणी भरून घेऊन पठार गाठले आणि तेल-बेलची वाट धरली. गावातल्या घरात परत एकदा पाणी ढोसले थोडी विश्रांती घेतली आणि सालतर खिंड मार्गे लोणावळा गाठले. मळलेले कपडे, रापलेले चेहरे आणि दमलेली शरीरे घेऊन लोणावळ्यातील रामकृष्णमध्ये आलो तेव्हा लोकांच्या नजरा आमच्यावर आणि आमच्या “हिरवळीवर” खिळल्या होत्या. कोक, सरबताचे ग्लासच्या ग्लास घशात रिचवत तहान भूक शांत केली मगच पुण्याला परतलो.
लहानपणी चार भिंतींच्या शाळेत शिकलो होतो, घोकलो होतो “पाणी हेच जीवन. पाणी वाचवा.” पण त्याचा अनुभव आला तो निसर्गाच्या सह्याद्रीच्या उघड्या शाळेत.