सिक्रेट कॅम्पिंगची गोष्ट

शनिवार-रविवारला जोडून सुट्टी आली कि सगळ्या ट्रेकर्सच्या डोक्यात नानाविध बेत ठरायला लागतात. या वेळी इकडे जाऊ, हे बघितले नाहीये, नवीन जागा हवी, आणि काय न काय. त्यातून आमच्यासारखे ट्रेकर असतील तर बेत नुसते  हवेतच विरणार. मोबाईलवर मेसेज, मेलवर चर्चा, फोनवर बडबड. असे आठवडाभर खेळ झाले तरी इकडे जाऊ का तिकडे असेच चालू असते. शेवटी मग कोणीतरी कंटाळून कल्टी मारतोच. मग पुन्हा नव्या भिडूच्या शोध. बाप्पांना निरोप दिल्यावर रविवार-सोमवार असे दोन दिवस एका भन्नाट कॅम्पिंगची स्वप्ने आम्ही चार-पाच टाळकी बघत होतो.

मुंबईकर लोकांनी आम्हाला टांग मारल्यावर मी आणि पंक्या असे दोघेच उरलो होतो. पण काही झाले तरी बेत तडीस न्यायचाच असे ठरवलेच होते आम्ही. पण कॅम्पिंगचे ठिकाण काही ठरत नव्हते. आधीपासून “आउट” असलेला अजय आयत्या वेळी हजर झाला. घरी बंड पुकारून तो आमच्याबरोबर यायला निघाला होता. कारण त्याचा वाढदिवस तो घरात बसून थोडाच काढेल? शिवाय खंड्यासुद्धा आमच्याबरोबर यायला तयार होता. तसे खंड्या पंकजसाठी नवीन जरी असला तरी त्याचे कॅमेरा-नामे पंक्याला नवीन नव्हते. रविवारी दुपारी तुडुंब जेवून माझ्या घरी चांडाळ चौकडी जमली. पण अजूनसुद्धा “कुठे जायचे?” हीच चर्चा सुरु होती. रायलिंग पठार, आहुपे घाट, तेल-बेल, भीमाशंकर, धोम धारण अश्या अनेक ठिकाणांवर विचार करून शेवटी ताम्हिणीतील सिक्रेट लेकवर शिक्कामोर्तब झाले. सह्याद्रीच्या अंगणात, खुल्या आभाळाखाली, रम्य तळ्याकाठी तंबू ठोकून निवांत गप्पा मारायचे मनसुबे रचत निघालो. तंबूसाठी थोडी पळापळ करावी लागली पण शेवटी ते ही जमवले.

सिक्रेट लेकजवळ आमच्या चाणाक्ष नजरेने एक जागा शोधून काढली. तो दिवस अजयचा असल्याने त्याने सांगितल्या प्रमाणे जागा होती ती. वस्ती पासून दूर. रस्त्यापासून लांब, पाण्याशेजारी, तंबूतून बाहेर आलो की चार पावलावर पाणी. जरा सपाटी बघून तंबू टाकला आणि शेकोटीच्या तयारीला लागलो. सूर्याने तर कधीच पाठीमागच्या डोंगरापलीकडे बुडी मारली होती. आकाशात काळ्या ढगांची गर्दी होत होती. का कोणास ठाऊक पण आमच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. पाऊस राडा घालणार. पण समोर शेकोटी पेटत असल्याने ही शंका तूर्तास बाजूला पडली. घरून आणलेले बटाटे आणि कांदे निखाऱ्यात खुपसले आणि बाजूला गप्पा मारत पहुडलो. सुख-दुखाची देवाण-घेवाण करत खरपूस भाजलेले कांदे-बटाट्यांचा फडशा पडला. आम्ही सूप-मॅग्गीच्या तयारीला लागायच्या आधीच देवाने आमच्या फजितीची तयारी गुपचूप केली होती. पावसाचा शिडकावा करत त्याने इशारा द्यायला सुरवात केली. आम्ही आडोश्याला तंबूत घुसेपर्यंत एका वीजेने कडाडत हल्ला-बोल केला. हा हा म्हणता पावसाने चांगलाच जोर धरला होता. तासाभरात थांबेल या आशेने तंबूत गुपचूप बसून राहिलो. पण पाऊस थांबायची काही चिन्हे दिसेनात. पोटातले कावळे आता वीजेच्या बरोबरीने कडाडत होते. “स्वीट डिश” म्हणून पंक्याने स्व-हस्ते बनवून आणलेला शिरा बाहेर काढण्याशिवाय काही पर्यायच नव्हता. साजूक तूप, केळी आणि सुकामेवा पेरलेला तो शिरा मस्तच जमला होता. समोरच्या शेकोटीवर पावसाने तर कधीच पाणी फिरवले होते पण तो आता तंबूतही शिरू पाहत होता. पावसाच्या जोरामुळे पाणी आत झिरपू लागले होते. मांडीवर कॅमेराच्या बॅगा, बुडाखाली बूट, हेल्मेट अशा अवस्थेत बसून राहिलो होतो. बाहेर पावसाचा नुसता धुमाकूळ चालू होता. १०-१२ स्पीडलाईट एकदम फायर करावेत तशा वीजा चमकत होत्या. जणू काही देव आम्हाला म्हणत होता “कॅम्पिंग करायचे काय? करा की मग. पाण्याशेजारी तंबू हवा? पाण्यातच टाका की. सकाळी उठले की समोर पाणी हवे ना? मग पाण्यातच बसा की रात्रभर.” शेवटी पहाटे ३च्या आसपास पाऊस ओसरला. तंबूतून बाहेर पडून आखडलेले शरीर सरळ केले. चहाच्या मगाने तंबूतून पाणी उपसून काढले. अजयच्याच शर्टने तंबू आतून कोरडा केला. आता निदान तीन तास तरी झोप मिळणार होती. पण पाठ टेकल्या-टेकल्या खंड्याचे “इंजिन” सुरु झाले. डायरेक्ट कानाच्या पडद्यावर आदळणारा त्या आवाजाकडे दुर्लक्ष करत डोळे मिटले.

पहाटेच पक्ष्यांच्या किलबिलाटाने झोप चाळवली. बाहेरचे वातावरण तर अतिशय सुंदर होते. पूर्वेला तांबूस रंग पसरत होता तर पश्चिमेला चंद्राची परत जायची लगबग होती. रात्रभराच्या गोंधळानंतर निसर्गाने आमच्या समोर अतिशय सुंदर नजराणा सादर केला होता. आता आम्हाला मनासारखे फोटो काढायला भरपूर वेळ मिळाला होता. पहाटेचे अलगद पसरणारे धुके, डोंगरामागून हळूच डोकावून येणारा सूर्य, पावसाळ्यानंतर फुलणारी इटुकली-पिटुकली रंगबेरंगी फुले, शाळेत जायची लगबग असलेली मुले अश्या अनेक फ्रेम्स टिपण्यात ३-४ तास मोडले तरी कमीच वाटतात. पण या स्वप्नवत जगतातून माघारी खऱ्या जगात यावेच लागते. आमचा कॅम्पिंगचा उद्देश जरी सध्या झाला नसला तरी एका वेगळ्याच अनुभवाची शिदोरी मात्र नक्कीच मिळाली.