कातळकभिन्न सरसगड

मागच्या शेवाळलेल्या भटकंतीनंतर दोन-तीन आठवडे उलटून गेले असल्याने पुढच्या भटकंतीचे वेध लागले होते. त्यातून रमजान-ईदच्या सुट्टीला जोडून विकेंड आला होता. त्यामुळे या संधीचा फायदा उठवत एखादी मोठी भटकंती आखावी असे डोक्यात होते पण असे ठरवून भटकंती कधी होते का? उपटसुंभासारखी अनेक छोटी मोठी कामे मध्ये मध्ये कडमडत गेली आणि मोठ्या भटकंतीचे स्वप्न हवेतच राहिले. श्रावण सुरु झालाच होता. उन-पावसाचे खेळ पण सुरु झाले होते. त्यामुळे निदान रविवारी तरी एखादा किल्ला सर करावा असे ठरले. नेहमीचे भिडू होतेच त्यात अनिरुद्ध “वाढीव” झाला (नाहीतरी त्याच्या नवीन गाडीला सह्याद्रीचे पाणी पाजायचे होतेच). विशेष म्हणजे यावेळी किल्ल्यांच्या नावावर चर्चा न घडता “सरसगड” या एकाच नावावर चक्क मिनिटभरात शिक्कामोर्तब झाले.

सरसगड पायथा
सरसगड पायथा

भटकंतीचे कोणतेही पायंडे न मोडता रविवारी पहाटे “स्वीकार”ला इडली-पोहे-चटणी हाणून सुरवात झाली. नवीन गाडी पळवत आणि उगाच बडबड करत खोपोली-खालापूर पटकन आले. म्युझिक-प्लेयर त्याच्या मनाला येईल ती गाणी वाजवत होता. हंटर-बिंटर नंतर अचानक त्याने “गावरान पाखरू” सुरु केले. आणि आमचा रस्ता चुकला (ट्रेकमध्ये रस्ता चुकल्या शिवाय मजा नाही). “गावरान पाखरू”च्या नादात पालीचा फाटा सोडून पेण रस्त्याला लागलोय ते आम्हाला तांडेलची मिसळ आल्यावर कळले. ह्याला विचार त्याला विचार करत पुन्हा खालापूर फिरून पाली रस्ता पकडला. गाडीत सगळेच हौशी छायाचित्रकार असल्याने ठीक-ठिकाणी थांबत एकदाचे पाली गावात आलो. गावाच्या पाठीमागेच आडदांड दिसणारा सरसगड खुणावत होता. पण भूकेपुढे सर्वकाही क्षम्य म्हणत आधी एका हॉटेलात शिरलो. चटकदार मिसळ आणि वडासांभार पोटात ढकलले. बल्लाळेश्वराचे बाहेरूनच दर्शन घेत गाडी उभी केली. आणि गडाच्या दिशेने निघालो. आमचा अवतार बघून तिथे फिरायला आलेल्या एकाने विचारले “यहा कोई ट्रॅक है क्या?” ते ऐकून टाळके सटकले आणि पायातला नवीन “कछुआ” बूट (थोडक्यात माझ्या नवीन बुटाची जाहिरात करतोय) त्याच्या तोंडात मारावा असे वाटले होते. पण जनाची नसली तरी मनाची लाज ठेवत शांतपणे उत्तर दिले “नही. इधर कोई रेल्वे ट्रॅक नही.” असो. सरसगडला पाली गावातूनच दोन वाटा जातात. एक देऊळवाडा मधून तर दुसरी रामआळीतून तलई गावातून.

भुयार
भुयार

देऊळवाडयाच्या वाटेने आम्ही चढाईस सुरवात केली. अंगावर येणारा खडा चढ असल्याने छातीचा भाता फुलला तर नाकाने बरोबरीने सूर लावला. वीसेक मिनिटात गावामागची छोटी टेकडी चढून सपाटीवर आलो. कोकणातील किल्ले कधीही केले तरी घाम काढतातच. त्यामुळे हाश-हुश करत एका झोपडीपाशी पहिला पडाव झाला. समोर सरसगडाचे कातळकडे अंगावर येत होते. पावसामुळे पायाखालचा दगड अतिशय निसरडा झाला होता. त्यातून नवीन बूटांमुळे दगडावर स्केटिंग केल्याचा अनुभव घेत मी चढत होतो. पुन्हा एकदा दहा-पंधरा मिनिटे खडी चढाई करून त्या कातळकड्यांपाशी आलो. इथे डाव्या हाताला एक छोटी दिंडीवजा खिडकी दिसते. आतमध्ये नक्की काय असेल याचा अंदाज येत नाही. एखादे भुयार अथवा पाण्याचे बंदिस्त टाके. टॉर्चच्या उजेडात आत जाऊन बघितले असता जाणवते की हे पाण्याचे टाके आहे. परंतु सध्या मात्र येथे पाणी नाही. शेजारून गडाच्या नाळेत (म्हणजे दोन कड्यांमधील निमुळती जागा) जायचा मार्ग आहे. येथून कातळात कोरलेल्या तब्बल ९६ पायऱ्या (घसरड्या) आपल्याला गडावर घेऊन जातात. एकेका पायरीची उंची दीड-एक फूट असल्याने वर जाईपर्यंत चांगलीच दमछाक होते. पण पुढे असलेला अखंड कातळात कोरलेला दरवाजा बघितल्यावर या दमणुकीचे काहीच वाटत नाही. दरवाजा कमानीचा असून त्यावर तीन पाकळ्यांचे फुल(?) कोरलेले आहे. दरवाज्याला लागून एक दोन भागात विभागलेले लेणे खोदलेले आहे. याचा उपयोग पहारेकऱ्यांच्या विसाव्याची जागा म्हणून होत असावा. इथून आपण गडाच्या माचीवर प्रवेश करतो. माचीवर आल्यावर समोरच बालेकिल्ला उठवलेला दिसतो. गडाची माची छोटीसी असून माचीवरून आपल्याला बालेकील्ल्यास वळसा घालता येतो.

आपण जिथून आलो त्याच्या डावीकडे गेल्यास आपल्याला एक पाण्याचा हौद (मोठे टाके) लागतो. त्यास “मोती हौद” संबोधतात. इथून सरळ पुढे गेल्यावर गडाच्या उत्तर बाजूच्या दरवाज्याकडे जाता येते. तसेच बालेकिल्ल्याला वळसा घालून पूर्वे दिशेने सुद्धा जाता येते. या मार्गावर खुपश्या गुहा आणि टाकी आहेत. यातील अनेक गुहा भिंती बांधून संरक्षित करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. यावरून येथे निवासस्थाने असावीत असे जाणवते. काही पुस्तकांमध्ये या गुहांचा उल्लेख कैदखाना म्हणून सुद्धा केलेला आढळतो. पावसाळ्यात या बाजूला गवत खूप माजले असल्याने जाताना काळजी घ्यावी. या गुहांबरोबर दोन-तीन पाण्याची टाकी सुद्धा आढळतात. काही टाक्यांमध्ये निरखून पहिले असता आत मध्ये खांब असल्याचे जाणवतात. तसेच एक गुहा अतिशय मोठी असून तिचे प्रयोजन नक्की काय असावे असा प्रश्न पडतो. या गुहेचे आतून तीन भाग पाडले आहेत. या बाजूने अजून थोडे पुढे गेल्यावर गडाची उत्तरेची बाजू येते. येथे एक चोर दरवाजा असून सद्य स्थितीत तो बुजलेल्या अवस्थेत आहे. येथेच एक अस्पष्ट शिलालेख दिसतो. उनपावसाचा मारा खाऊन झिजलेल्या या शिलालेखावरची “जयम” एवढीच अक्षरे जाणवू शकतात. नक्की कोणत्या काळातील हा शिलालेख असावा याची कल्पना मात्र येत नाही. थोडे बाजूलाच गडाचा उत्तर दरवाजा आहे. अखंड कातळात खोदलेल्या या दरवाज्याच्या  कमानीवर त्रिशूळ कोरलेले दिसते. गडावर येण्याची दुसरी वाट या दरवाज्याने येते. दरवाज्यासमोरच जोत्याचे अवशेष असून कदाचित येथे पूर्वी सदरेवजा इमारत असावी. या जोत्याशेजारून डावीकडे जाणारी वाट आपल्याला बालेकिल्ल्यावर घेऊन जाते. तर उजवीकडे जाणारी वाट बुरुजावर घेऊन जाते. डाव्या वाटेने वर गेल्यावर एक टाके लागते. या ताक्याशेजारून माथ्यावर जाण्यास पायऱ्या आहेत. माथ्याचा विस्तार फार नसून आकाराने चिंचोळा आहे. माथ्यावर एक शाहपीराचे थडगे आहे. पूर्वेला गेल्यास एक भलामोठा तलाव दिसतो. या तलावाशेजारीच केदारेश्वराचे मंदिर आहे. या मंदिराची सध्याची अवस्था फारशी चांगली नसली तरी मंदिराचे गतवैभव आसपास पडलेल्या कोरीव दगडावरून जाणवते. माथ्यावरून सभोवतालचा प्रदेश फारच सुंदर दिसतो. हवा स्वच्छ असल्यास पूर्वेला सुधागड, तेलबेल, घनगड, कोरीगड तर पश्चिमेला अंबा नदीच्या खोऱ्याचे दर्शन घडते. केदारेश्वराच्या मंदिरात थोडावेळ विश्रांती घ्यायची आणि परत माचीवर उतरायचे. संपूर्ण गड पाहण्यास ३ तास  पुरतात.

पाली गाव

खाली उतरताना मात्र आमची छाती (विशेषतः माझी) चांगलीच धडधडत होती. पावसाची एक जोरदार सर येऊन गेल्याने पायऱ्या अजूनच निसरड्या झाल्या होत्या. त्यातून माझा कछुआ बूटांवरचा विश्वास पूर्ण उडाला असल्याने अनवाणी उतरत होतो. घसरत-पडत शेवटी एकदाचे सगळ्या पायऱ्या उतरून घाली आल्यावर हायसे वाटले. कातळमाथ्यावरच्या या किल्ल्याची उभारणी सुधागडकालीन असावी असे तज्ञ मानतात. गडावरची टाकी, गुहांचे बांधकाम यावरून सरसगडाचे प्राचीनत्व नक्कीच जाणवते. किल्ल्याच्या इतिहासाचा विचार करता-करता पालीगावात कधी उतरलो ते  लक्षात येत नाही. परतीच्या वाटेवर मागे वळून पाहता ढगांशी झुंजणारा कातळकभिन्न सरसगड पाहिल्यावर आजचा दिवस एका पुरातन वस्तूच्या सान्निध्यात घालाविल्याचा आनंद मनास नक्कीच मिळतो.

सहभागी भटके – अजय काकडे, अमित कुलकर्णी, महेश लोखंडे, अनिरुद्ध लिमये.
छायाचित्रे – अमित कुलकर्णी