फोर बाय फोर भटकंती : साताऱ्याच्या मुलुखात

गेल्या आठवड्यात १५ ऑगस्टला जोडून सुट्ट्या घेतल्या कि नाही तुम्ही? अनायसे भरपूर मोठा वीकेंड मिळत होता त्याचा फायदा ट्रेकर मंडळींनी नक्कीच घेतला असणार. आम्हीसुद्धा वाहत्या गंगेत हात धुवून घेतले हे काही वेगळे सांगायला नको.

भटकंतीचा नकाशा
भटकंतीचा नकाशा

मागच्याच महिन्यात महाड भागात फिरताना गुडघा चांगलाच दुखावला होता. डॉक्टरांनी नानाविध तपासण्या केल्यावर सक्तीची विश्रांती माथी मारली होती. त्यामुळे महिनाभर घरात बसून नुसतेच बेत ठरवत होतो. १५ ऑगस्टला जोडून सर्वांची भली मोठी सुट्टी होतीच. त्यामुळे एकदमच मोठी मोहीम ठरवून निदान ४-५ गड-किल्ले तरी सर करावेत असे सर्वांचे मत पडले. माझ्या गुडघे-दुखीमुळे फार त्रासाची भटकंती अवघड गेली असती म्हणून माणदेश आणि खटाव-कराड भागातील किल्ले सर करण्याचे ठरले. नेहमी प्रमाणे ही भटकंती ठरतानासुद्धा निदान १०० ई-पत्रे धाडली गेली, २-३ पर्यायी बेत आखले गेले आणि शेवटी एक भिडू फुटला. पंकजला बागलाण प्रांताने हाक दिल्याने तो त्या मोहिमेवर रवाना झाला. तरीही आमचा निग्रह आणि माझा “knee”ग्रह अढळ राहिला. आमचा वाटाड्या आणि “अनुभवी ट्रेकर”ने मोहिमेची पूर्व तयारी म्हणून सातारा प्रांतातील माणदेश आणि खटाव परिसराचा कच्चा नकाशा काढून पाठवला.

सह्याद्रीच्या मुख्य रांगेतील राजगड, तोरणा सारख्या अभेद्य आणि आकाशाला गवसणी घालणाऱ्या गडकिल्ल्यांपुढे माणदेशातील छोटेखानी लुटूपुटूचे किल्ले दुर्लक्षित झाले आहेत. सह्याद्रीत तुफानी पाऊस पडत असला तरी हे किल्ले अजूनही पावसाच्या पहिल्या सरीसाठी आतुरले आहेत. या किल्ल्यांच्या इतिहासाला उजाळा देण्यासाठी आणि आमची भटकंतीची हौस भागवण्यासाठी आम्ही निघालो होतो. बोकीलने या वेळी सामान्य माणसाप्रमाणे ४ दिवसाचा बेत आखला. फक्त त्यात १० किल्ले घुसडले होते. तर आमचा नवीन भिडू प्रांजल याने त्याची गाडी आणायची तयारी दाखवली. चला. सगळे जुळले तर होते. आता फक्त १५ ऑगस्टची वाट पाहत होतो.

ठरल्याप्रमाणे आम्ही चौघे जण चार दिवस जाऊन सुद्धा आलोय पण आमच्या फोर बाय फोर भटकंतीचा संपूर्ण वृत्तांत वाचण्यासाठी थोडे थांबावे तर लागेलच ना!! नाहीतर त्याची मजा कशी येणार?

Satara-Ranges