मोहन कावळ्या चांभार आणि लिंबूटिंबू

जसजसा मे महिना संपत आला तशी सर्वांना चाहूल लागली होती ती पावसाची. धगधगणाऱ्या मे महिन्यातसुद्धा आम्ही जंगलयात्रा करून सह्याद्रीची साथ सोडली नव्हती. तर पावसाच्या आगमनानंतर थोडीच सुटणार होती? जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाने हजेरी लावल्याबरोबर आमच्या डोक्यात सूत्रे हलू लागली. वेगवेगळे बेत ठरू लागले. खरेतर पावसाळ्यात ट्रेक ठरवणे सर्वात अवघड. सगळीकडेच जावेसे वाटत असते. पण एका दमात सर्व सह्याद्री थोडीच फिरून फिरून होणार?  त्यातूनच हा आठवडा पुणेकरांसाठी माउलींचे आदरातिथ्य करण्यात गेला होता. बहुतांश फोटो-ट्रेकर मंडळी माउलींना दिवे घाटात भेटण्यासाठी जाणार होती. आम्हीसुद्धा याला अपवाद नव्हतो. पण यापेक्षा एखाद्या गडवारीस प्राधान्य देत ३ दिवसाचा बेत आखायचे पक्के झाले. अजून पावसाने जोर धरला नसल्यामुळे कोकणातील महाडप्रांती मुशाफिरी करून २-३ किल्ले फिरायचे ठरले. मोहनगड-कावळ्या-चांभारगड आणि अजून काही लिंबूटिंबू किल्ले. या ट्रेकसाठी आमचे मित्रवर्य अनुप बोकील यांनी बदलापुराहून खास येणे केले होते.

हिरडस मावळ
हिरडस मावळ

कधी नव्हे ते माझ्या घरी सगळी मंडळी अगदी वेळेवर हजर झाली. खाऊ-पिउचं काहीच सामान न घेता जाणार असल्याने आमचे पिटू अगदीच रिकामे होते. त्यातून पंक्याने त्याचा “अतिशय जड” असा नवीन कॅमेरा आणून आम्हाला जळवले होते. आमच्या घशात चहा आणि गाडीच्या पोटात पेट्रोल ओतून हायवेला लागलो. अनुपने सुचवल्याप्रमाणे बेत ठरला होता. पहिल्या दिवशी मोहनगड-कावळ्या आणि शिवथर घळईत मुक्काम. त्याच्यामध्ये आम्ही सोयीने थोडासा बदल करून भोरमध्ये मिसळ चापून घेतली. तिथेच दुर्गाडीचा (मोहनगडचे दुसरे नाव) रस्ता विचारून घेतला आणि निगुडघर मार्गे गडाचा पायथ्याचे दुर्गाडी गाव गाठले. गावामध्ये मोहनगड विचारले असता सर्वांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उभे राहत होते. म्हणून फक्त जननीमातेच्या मंदिराकडे जायचे म्हणाल्यावर एका पोराने गावाला खेटून उभा असलेला डोंगर दाखवला, तर बाजूच्या वाण्याने अजून भलतीच वाट सांगितली. पण दोघांनी एकाच डोंगराकडे बोट दाखवल्याने हाच मोहनगड उर्फ दुर्गाडी हे पक्के झाले. तिथेच एका मावशींकडे सामान ठेवून गडाची वाट धरली. वाटेत एका निवांत जागी “जनी अंधारी बाजी” अश्या नावाच्या देवीचे बसके-कौलारू पण प्रेमात पडण्याजोगे मंदिर लागले. आजूबाजूला पडलेल्या वीरगळ बघून तेथे पूर्वी झालेल्या युद्धाची कल्पना येत होती. कोण्या एका महारथीचे वृंदावनसुद्धा तेथे होते. थोडी चढाई केल्यावर एका खिंडीत ३ वाटा दिसल्या. त्यातली नेमकी वाट सोडून भलत्याच वाटेवर लागल्यामुळे आम्हाला “सुलतानढवा” करूनच डोंगर चढावा लागला. पुढे गडाच्या कातळाला बिलगून असलेल्या झाडीतील मळलेली वाट दिसताच हायसे वाटले. गडाला पूर्ण वळसा घालून आल्यावर कातळात खोदलेल्या काही पायऱ्या दिसतात. त्यावरून वर जाताच समोर येते ते जननी मातेचे मंदिर. येथूनच खालच्या अंगाला सुमधुर पाण्याचे टाके आहे. या सर्व परिसराला हिरडस मावळ असे संबोधले जाते. नैऋत्येला कांगोरीचा मंगळगड आपल्या भक्कम तटबंद्या दिमाखाने मिरवत उभा असलेला दिसतो तर आग्नेयेला रायरेश्वर आणि नाखिंदा टोक दिसते. तर उत्तरेला कावळ्याचा एक सुळका डोके काढून खुणावत होता. मोहनगड अथवा दुर्गाडी बद्दल अजून थोडेसे सांगायचे झाले तर या किल्ल्याची डागडुजी करण्यासंबंधीचे महाराजांनी बाजीप्रभूंना पाठवलेले एक दुर्मिळ पत्र उपलब्ध आहे. हिरडस मावळचे मोहक रूप डोळ्यात आणि अर्थातच कॅमेरात साठवून आम्ही गड उतरू लागलो.

मोहनगड अथवा दुर्गाडी वरून दिसणारा सह्याद्री
मोहनगड अथवा दुर्गाडी वरून दिसणारा सह्याद्री

मोहनगडाच्या उतरंडीवर माझा गुडघा दुखावल्याने माझा वेग मंदावला. तरी तासाभरात खाली आलोच. पावसाची एक सर आल्याने मावशींच्या घरातच थोडावेळ थांबलो. त्यांनी केलेला जेवायचा आग्रह जरी मोडला तरी चहाचा आग्रह मात्र आम्हाला मोडता नाही आला. चुलीवरचा कोरा चहा पिऊन आलेली तरतरी न घालवताच आम्ही वरंधचा रस्ता पकडला. आता पुढचा टप्पा होता वरंध घाटाचा पहारेकरी कावळ्या किल्ला. भोर-महाड रस्त्यावरील हा घाट जर कोणाला परिचयाचा नसेल तरच नवल. याच घाटात एका ठिकाणी डोंगर फोडून एक खिंड बनवली आहे. येथेच सध्या अनेक चहा-भजीच्या टपर्या आहेत. पुण्या-मुंबईचे लोक या फोडलेल्या डोंगराला “toad” अथवा “बेडूक” असे संबोधतात. पण हाच बेडूक एकेकाळी या वरंध घाटाचा रक्षक मनाला जायचा. या खिंडीतील एका टपरीवर खेकडा भजी खायचा मोह काही आम्हाला आवरला नाही. भजी बरोबरच मामांनी गडाची वाटपण सांगितली आणि चार मौलिक सल्ले सुद्धा. तिथेच आमचे सामान ठेऊन जरुरीपुरते पाणी घेऊन आम्ही कावळ्या सर करण्यास निघालो. अर्ध्या तासातच आम्ही किल्ल्याच्या एकमेव बुरुजावर पोचलो. तिथे उभे राहून सह्याद्रीच्या पायाशी खेळणाऱ्या कोकणाचे रूप फारच मोहक होते. उत्तरेला गडांचा गड राजगड आपला बालेकिल्ल्याचा मुकुट सांभाळत तोऱ्यात उभा होता तर बाजूलाच तळहातावर घेतलेला बुधला सावरत तोरणा आपली उंची दाखवत होता. घाटावरून कोकणात उतरणारे मढ्या, उपान्ड्या, शेवत्या घाट आपले अस्तित्व दाखवत होते. आणि या दोहोंच्या मध्ये समर्थांची शिवथर घळई रात्रीच्या मुक्कामास बोलावत होती. कावळ्याबाबत फारसा इतिहास ज्ञात नसला तरी वरंध घाटाचा संरक्षक म्हणूनच हा किल्ला नावाजला होता हे नक्की. परतीच्या मार्गावर एक तुळशीवृंदावन आणि जमिनीत रोवलेला त्रिशूळ पाहायला मात्र विसरलो नाही. काळ्या ढगांनी आकाशात जमून मावळतीच्या सूर्याला झाकायचा प्रयत्न सुरु केला होता तरी सूर्याची सोनेरी किरणे त्यातून पाझारायची थोडीच थांबणार? तेवढ्यात आलेल्या पावसाच्या सरीने शिवथरच्या खोऱ्यात रंगांची उधळण करत इंद्रधनुष्य उमटवले. हा देखणा नजारा डोळ्यामध्ये साठवत आम्ही खिंडीत परतलो. मामांच्या हातचे लिंबू सरबताचे दोन-दोन ग्लास रिचवत शिवथरचा मार्ग धरला.

कावळ्या किल्ला
कावळ्या किल्ला

खरे तर शिवथरच्या सुंदरमठात राहायची सोय होते ती फक्त पूर्व-परवानगीनेच. परंतु आम्ही अचानक उभे ठाकल्याने तिथल्या सेवेकऱ्यांना आमची थोडी शंका आली असावी. परंतु अजयने त्यांना आमच्या भटकंतीचा उद्देश आणि निर्व्यसनीपणा पटवून देताच आमच्या रहायची सोय झाली. तिथली व्यवस्था अगदीच चोख होती. म्हणजे अंग धुण्यास कढत पाणी, झोपण्यास सतरंजी आणि डोक्यावर पंखा. शिवाय प्रसादाचे जेवण असल्याने आम्हास वेगळा शिधा बनवण्यास त्यांनी मनाई केली होतीच. संध्या-स्नान करून आम्ही तेथील दैनंदिन उपासनेस हजर झालो. मनाचे श्लोक, समर्थांची आरती आणि श्रीराम मंत्राच्या घोषात वातावरण अगदी प्रसन्न होऊन गेले होते. प्रसादाची सोय तर आम्हास अगदीच पर्वणी होती. वांगी-बटाट्याचा रस्सा, मसुराची उसळ, भात आणि पुरण. वाहः.. आणि त्यानंतर ताकाने तर अजूनच मजा आणली. तृप्त मनानेच आम्ही झोपेच्या कुशीत शिरलो.

पहाटे काकडारतीच्या घंटेनेच आमचे डोळे उघडले. कढत पाण्याने अंग शेकत अंघोळ उरकली आणि आरतीसाठी हजर झालो. लोणी-साखरेचा प्रसाद व चहा घेतला आणि घळईत जाऊन समर्थांचे आशीर्वाद घेऊन पुढच्या  भटकंतीस निघालो. आता पुढचा किल्ला चांभारगड. महाड शहरास अगदी खेटून उभा. शिवथर-महाड रस्ता अगदीच निर्मनुष्य होता. गावकरी नुकतीच आन्हिके आवरून शेतावर जायला निघत होते. जंगलातील शांततेचा भंग करत आमच्या गाड्या महाडच्या दिशेने पळत होत्या. मधेच आवाजाने बिथरलेल्या एका हरणाने दर्शन देत आमच्या दिवसाची सुरवात सार्थकी लावली. बिरवाडीच्या फाट्यावर भजी-पाव आणि मिसळ खाऊन महाड शेजारील चांभारखिंड गावात पोहोचलो. गावातील एका पोराने शाळेशेजारून गडावर जाणारी वाट दाखवली.  शाळेतच एका रिकाम्या वर्गात सामान ठेऊन चांभारगडाची चढाई सुरु केली. पुन्हा एकदा वाट चुकली आणि आम्हाला घसाऱ्यावरून गडाचा माथा गाठावा लागला.

चांभारगड
चांभारगड

चांभारगडबद्दल इतिहासात फार नोंदी उपलब्ध नाहीत. पण पूर्वी जवळपास एखादा महत्वाचा किल्ला असेल तर परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी काही छोटे किल्ले बांधण्याची पद्धत होती. या किल्ल्यांना प्रभावळीतील किल्ले असे संबोधले जायचे. चांभारगड हा रायगडाच्या प्रभावळीतील एक किल्ला मानला जायचा. गडाचा घेर तसा कमीच आहे. थोड्याफार खोदीव पायऱ्या, एक-दोन पडके बुरुज आणि बरीचशी पाण्याची आटलेली टाकी. माथ्यावरून महाड प्रांतावर एक नजर फिरवून परत गावात उतरलो. आम्हाला उतरताना पाहताच शाळेतल्या पोरांनी “Man vs Wild” म्हणून एकच गलका केला. त्यांची चौकस बुद्धी जागृत होऊन “काय दिसले? काय पकडले?” अश्या प्रश्नांची सरबत्ती सुरु झाली. तेवढ्यात शाळेतील एका गुरुजींमुळे आमची त्या हल्ल्यातून सुटका झाली. तिथेच थोडावेळ बसून पाणी पिऊन घेतले, शिक्षकांकडून दासगावचा रस्ता विचारून घेतला आणि परत गाड्या हमरस्त्याला लावल्या.

आत्तापर्यंत तीन किल्ल्यांवर पदभ्रमण झाले होते. पण आता माझ्या दुखऱ्या गुडघ्याने असहकार पुकारायला सुरवात केली होती. त्यामुळे सोनगड आणि गांधारपाले लेण्यांचा बेत रद्द करून आम्ही दासगाव उर्फ दौलतगड आणि पन्हळघर असे दोन लिंबूटिंबू टेकडीवजा किल्ले बघायचे ठरवले.

दौलतगड उर्फ दासगावचा किल्ला
दौलतगड उर्फ दासगावचा किल्ला

महाडवरून माणगावी जाताना पंधरा मैलावर  दासगाव  लागते. गाव तसे लहानच पण अतिशय देखणं निसर्ग लाभलेले. गावाला पाठीराखा म्हणून एक टेकडीवजा किल्ला सुद्धा लाभलाय. दौलतगड उर्फ दासगावचा किल्ला या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या किल्ल्यावर कोण्या एका इंग्रज अधिकाऱ्याने बंगला बांधल्याची नोंद सापडते. करवंदीच्या जाळीतून रस्ता काढत गडमाथा कधी आला ते कळलेच नाही. गडमाथा अगदीच छोटा आहे. पण वरून दिसणारे दृश्य मात्र अजूनही डोळ्यासमोरून हलत नाही. सावित्री आणि काळ नदीच्या संगमामुळे येथे अनेक बेटे तयार झाली आहेत. तर  नदीचे पात्रसुद्धा विस्तीर्ण पसरले आहे. काठावर वसलेली छोटी छोटी गावे, हिरवागार परिसर,  त्यातूनच वाट काढत जाणारी कोकण रेल्वे आणि नदीचे पात्र ओलांडणारा देखणा पूल. इंग्रज अधिकाऱ्याच्या घराचे जोते, आणि एक विहीरवजा तलाव असे काही थोडेफार अवशेष बघून आम्ही पायथा गाठला. सुमारे तासभराच्या या गडफेरीत इतिहासापेक्षा निसर्ग सौंदर्यच अधिक भावले.

आता पुढचा आणि अखेरचा किल्ला म्हणजे पन्हळघर. नुकत्याच प्रकाशात आलेल्या या किल्ल्याबद्दल फारसे कोणाला माहित  नव्हते. माणगावच्या अलीकडे लोणेरे गावातून पन्हळघरसाठी फाटा जातो. पन्हळघर हेच गडाच्या पायथ्याचे गाव. गावाशेजारीच एक आदिवासीवाडी आहे. तिथेच बंद शाळेत थांबून थोडी पोटपूजा केली. हा किल्ला म्हणजे खरेच एक टेकडी आहे. म्हणजे खालून एखाद्याने दगड जरी फेकला तरी तो गडावरून पलीकडे जाईल एवढीच उंची (लहानपणी शाळेत अतिशयोक्ती अलंकार शिकलो होतो त्याचा कुठेतरी उपयोग झाला). अनुपने खालीच थांबून राहायचा निर्णय घेतल्यामुळे आमचे सामान त्याच्या देखरेखीत ठेऊन गड चढाईस प्रारंभ केला. मळलेली वाट नसल्याने पुन्हा एकदा “सुलतानढवा” आमच्या मदतीस आला. माझ्या दुखऱ्या पायांनी फटाफट चढत माथा गाठला. किल्ल्यावर प्रत्येक इंच न इंच धुंडाळूनसुद्धा पाण्याच्या टाक्या व्यतिरिक्त काहीच सापडले नाही. पण रायगडच्या दर्शनाने एवढ्या वर चढून आल्याचे सार्थक झाले. त्याच्या बाजूलाच लिंगाण्याचा सुळका टाचा उंचावून  आमच्याकडे बघायचा प्रयत्न करत होता. खाली थांबलेल्या बोकीलच्या पापण्या मिटेपर्यंत आम्ही गडफेरी करून परत आलो होतो.

परतीच्या वाटेवर परंपरेनुसार नदीमध्ये मनसोक्त डुंबलो. तिथल्या बेडूकमाश्यांबरोबर सगळा शीण घालवला आणि माणगाव गाठले.  तुडुंब जेवण करून  ताम्हिणीमार्गे पुण्यास निघालो. पावसाशी शिवाशिवी खेळत हमरस्त्याने आम्ही पुणे गाठले जरी असले तरी सह्याद्रीतील आडमार्गावरील या उपेक्षित किल्ल्यांच्या भटकंतीने यंदाच्या हंगामाची झालेली सुरवात नक्कीच सुखावह आहे.

कावळ्या किल्ला
कावळ्या किल्ला